गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

भक्तमंडळी आणि त्यांचे अर्ग्यूमेंटस्

कार्टून क्रेडीट : Cartoonist Satish Acharya

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळविला. तोवर अफगाणींवर तालिबानने अत्याचार केल्याच्या बातम्या आपण ऐकून होतोच. अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार होतोय, नागरिक सैरावैरा पळत आहेत. आजपर्यंत आपण रेल्वेवर बसून किंवा लटकून लोकांनी प्रवास केल्याचं माहिती होतं. मात्र, अफगाणिस्तानमधील घटनेनंतर लोक विमानाला लटकून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळालं. तालिबानने अफगाणिस्तानमधल्या स्वातंत्र्याचा गळा घोटला. त्यामुळे तालिबानची करावी तेवढी निंदा कमीच. आता मुद्दा आहे की, भारतातल्या भक्तमंडळींच्या अर्ग्यूमेंटचा. २०१६ साली भारताचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांनी केलेला पराक्रम आपल्याला माहितीच आहे 'नोटबंदी'. भारतातील बँकांच्या बाहेर कोटींच्या संख्येने पैसे जमा करण्यासाठी आणि बदलून घेण्यासाठी तरुणांपासून वृद्धांपर्यंत रांगाचं रांगा लागल्या होत्या. त्यावेळी लोकांना होत असलेला त्रास पाहून, 'देशासाठी साधं रांगेत उभा राहू शकत नाहीत का?' असं भक्तांनी अर्ग्यूमेंट केलं. कदाचित लोकांनी याला प्रतिसाद पण दिला असेल. जाऊद्या मोदी म्हणालेत ना, 'नोटबंदी केल्यामुळे दहशतवाद्यांच्या कुरापती बंद होतील. ब्लॅक मनी बाहेर येईल.' तर होईल कदाचित. फेब्रुवारी २०१९ ला पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या सीआरपीएफ जवानांवर हल्ला चढवला, यात ४४ जवान शहीद झाले. तसेच जवळपास ९९ टक्के रक्कम जमा झाली. त्यामुळे नोटबंदी निर्णयाचं काय झालं, हे लोकांना चांगलचं लक्षात आलं.

देशात महागाई वाढली तरी चालेल, पण देश सुरक्षित राहिला पाहिजे आणि तो मोंदींसारख्या नेत्यामुळे सुरक्षित आहे. अशा प्रकारचे मेसेजेस अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून भक्तमंडळी पसरवत आहेत. म्हणजे अफगाणिस्तानची घटना घडली ३ दिवसांपूर्वी आणि पेट्रोल, डिझेल, गोडेतेल, एलपीजी गॅसचे भाव गेल्या २ वर्षांपासून तेजीने वाढतायेत. सामान्य नागरिकांसाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि महागाई हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. ज्या म्हातारीने वर्षभर कमावलेले पैसे नोटबंदी झाल्यानंतर रांगेत उभे राहून बदलून घेतले. तिच्या रोजच्या जगण्यावर महागाईचा परिणाम होतो. खेड्यापाड्यात येऊन सामान्यांसोबत असलं अर्ग्यूमेंटस् करा. मग लक्षात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा