बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा विदर्भातील महत्त्वाचा मतदारसंघ असून शेतीआधारीत लोकांची संख्या जास्त आहे. सोयाबीन, कापूस ही येथील मुख्य पिके आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्रानुसार ढोबळमानाने दोन भाग पडतात. एक ‘घाटावर’ आणि दुसरा ‘घाटाखाली’. एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या लोकसभा मतदारसंघामधील तीन जागा या भाजप, दोन जागा शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या आहेत तर एक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. बुलडाणा, मेहकर, चिखली, सिंदखेड राजा, जळगाव जामोद आणि खामगाव हे विधानसभा मतदारसंघ आहेत.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघ २०१९ निकाल:
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बुलडाण्यातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी यश मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता. यावेळी एकूण ६५.५३ टक्के मतदान झाले होते. यात जाधव यांना ४६.५९ टक्के मताधिक्य मिळाले तर शिंगणे यांना ३४.६९ टक्के मतदान झाले. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणझे वंचित बहुजन आघाडी. वंचितचे सिरस्कर बळीराम यांनी १५.४१ टक्के मते मिळवली होती.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघ २०२४ आढावा:
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले. २०१९ च्या तुलनेमध्ये यंदा मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. यंदा बुलडाणा लोकसभा मतदारसंघात ६२.०३ टक्के मतदान झाले. मोठ्या राजकीय घडामोडीनंतर मतदारसंघातून मुख्यत्वे ‘एनडीए’तर्फे (शिवसेना घटक पक्ष) प्रतापराव जाधव, ‘इंडिया’कडून नरेंद्र खेडेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मगर, अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आणि अपक्ष उमेदवार संदीप शेळके हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. खामगाव-जालना रेल्वेमार्ग, उद्योगधंदे, शेतीच्या विविध प्रश्नांसह सोयाबीन आणि कापूस पिकाला मिळणारा भाव, मराठा आरक्षण, धार्मीक धृवीकरण, राम मंदीर, केंद्रसरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना, उमेदवारांची वैयक्तीक टिकाटिप्पणी, सत्ताधारी खासदारांची कामे व त्यांच्या विरोधातील १५ वर्षांची अँटी इन्कबंन्सी, महागाई, पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचा फॅक्टर आणि इतर राष्ट्रीय मुद्द्यांच्या भोवती निवडणुकीचा प्रचार पार पडला.
उमेदवारांना चिन्हे जाहीर झाल्यापासून मतदान पार पडेपर्यंत बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये विविध उमेदवारांमधील प्रचाराची आघाडी वेगवेगळ्या स्तरावर होती. शेतकरी प्रश्नावर काम करणारे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्यामध्ये सुरुवातीला लढत पाहायला मिळत होती. मात्र, अंतिम टप्प्यामध्ये मुस्लिम आणि मराठा मतदारांनी ‘गेम चेंज’ केल्याचे दिसते. अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या सोयाबीन कापूस भाववाढीच्या आंदोलनामुळे त्यांच्याकडे शेतकरी आकर्षीत झाले. मात्र, पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत नसल्याने मतदारांचा विश्वास कमी झाला. २०१९ च्या लोकसभेवेळी वंचित बहुजन आघाडीने बऱ्यापैकी मते मिळवली होती. यंदा माळी समाजातून येणारे वसंत मगर यांनी वंचितकडून निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा मतदारसंघावर फारसा प्रभाव टाकू शकणार नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता:
पीएम किसान सन्मान निधी योजनेमुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. तसेच राम मंदीर, कलम ३७० हटवणे एकंदरीतच मोदींची देशभरातील लोकप्रियता यामुळे प्रतापराव जाधव थोडेसे सकारात्मक परिस्थितीत आहेत.
मतांची विभागणी:
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात जाधव, खेडेकर आणि तुपकर यांच्यात तिरंगी लढत झाली तर धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊन शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना फायदा होणार आहे. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये खेडेकर आणि जाधव अशी दुरंगी लढत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अल्पसंख्याक आणि मराठा आरक्षण मुद्द्यावरून मराठा मते ही खेडेकर यांच्याकडे एकगठ्ठा वळली तर खेडेकर यांचा विजय शक्य आहे.
विजयी मतांचा फरक:
बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून २०१९ साली शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी सव्वा लाखांपेक्षा अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. यंदा मात्र, विजयी उमेदवार ४० ते ५० हजारांच्या फरकाने जिंकून येण्याची शक्यता आहे.

