सोमवार, २७ मे, २०२४

शाळेत आता शैक्षणिक धड्यांऐवजी धर्माचे धडे

 

दैनिक लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये लोकमानस या वाचकांचे पत्रव्यवहार सदरामध्ये प्रसिद्ध झालेले पत्र

शाळेत आता शैक्षणिक धड्यांऐवजी धर्माचे धडे - २८ एप्रिल २०२४

इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक घालण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न आहे. ह्यावरून गोष्ट सिद्ध होते की, शाळेत आता शैक्षणिक धड्यांऐवजी धर्माचे धडे दिले जाणार आहेत. जगात आर्टीफिशीयल इंटेलेजन्सचा बोलबाला असताना आपण नेमकं कोणत्या दिशेने चाललो आहोत. ‘करू नये तेंचि करि..’ अग्रलेख वाचला. मनुस्मृती आणि मनाचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात राज्य सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती जाळली आणि देशातील समस्त स्त्रिया आणि वंचितांच्या पायातील गुलामीच्या बेड्या गळून पडल्या. मनस्मृतीमध्ये समाजात भेदभाव करणारे नियम आहेत. एकाच गुन्ह्यातील शिक्षा ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्रांना वेगवेगळी होती. यात शुद्रांना मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा देण्यात येत होती तर तुलनेने ब्राम्हणांना गाय व धान्य दान करणे अशी थातूरमातूर शिक्षा देण्यात येत होती. तसेच स्त्रियांचे स्थान तर केवळ वस्तू म्हणून होते. एवढं सगळं असताना शालेय शिक्षण मंडळातील तथाकथित अभ्यासकांना मागचे दिवस पुढे आणायचे आहेत काय? अग्रलेखात सांगितल्याप्रमाणे मनाचे श्लोक यावर शाळांमध्ये आतापर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातून विद्यार्थ्यांकडून फक्त शेकडोंमध्ये श्लोकांचे पाठांतर करून घेतले जाते. त्याच्या अर्थाविषयी कधी चर्चा सुद्धा होत नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची दैना आहे. आर्टीफिशीयल इंटेलेजेन्समुळे जगभरातील बाजारपेठ आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मात्र, ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकच आणखी काळानुसार बदलेले नाहीत (अपवाद काही शाळा असतील). ग्रामीण भागात अजुनही पारंपरिक पद्धतीने ज्ञानदानाचे काम सुरू आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार शिक्षकांना योग्यवेळी प्रशिक्षण देणे, शाळेसाठी लागणारे साधनं पुरविणे, निवडणुकीच्या कामांतून सुटका करून त्यांचे संपूर्ण लक्ष विद्यार्थ्याकडे वळविणे. ही सरकारची कामे असताना, सरकार मात्र शिक्षणाचे धडे देण्याऐवजी धर्माचे धडे देण्याचा विचार करतयं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा